Thursday 29 January 2015

हे ज्ञानसूर्या

हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी
परिवर्तनाचा तू सूर्य भूमी.॥ध्रु॥
विचार तुझे सर्वकाळी असू दे
कुठे जातीभेद अन्याय नसु दे
जळु दे विषमता आणि गुलामी
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥१॥

तुझ्या प्रेरणेने घडो लोकसेवा
तुझ्या प्रज्ञेने ज्ञानी समाज व्हावा
मिटावा अंधार अज्ञानयामि
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥२॥

तन मन पोशाख स्वच्छ ते ठेवु
तुझ्या धाडसाने पुढे पुढे जाऊ
जिंकु पदे स्वाभिमानाने आम्ही
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥३॥

जपु शील आम्ही प्राणाहुनीही
चिरंजीव ठेवु जगी लोकशाही
मनापासुनी जपु माणूसकी आम्ही
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥४॥

चला आता सारे संघटित होऊ
विचारांचे दिवे घरोघरी लावु
सुखी होऊ सारे सुखी करु भूमी
हे ज्ञानसूर्या तुला वंदितो मी.॥५॥

कवी-महेश लोखंडे जि.प.प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) ता.कराड जि.सातारा